सांगोला – रस्ता सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी, रस्ते अपघात टाळण्यासाठी व वाहतूक नियमांबद्दल शिक्षित करण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानाची आवश्यकता असून, सुरक्षित प्रवास, हेच जीवनाचे ध्यास आहे असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूजचे मोटार वाहन निरीक्षक एस.एस.पाटील यांनी केले. सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे, ता.सांगोला येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत सुरक्षित प्रवास आणि वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. याप्रसंगी सहा.मोटार वाहन निरीक्षक पी.डी.पाटील, शरद मोरे, संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले, विश्वस्त विश्वजित इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील उपस्थित होते.
परिसंवादात एस.एस.पाटील म्हणाले, रस्ते अपघात हे देशातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. दररोज अंदाजे ३२८ जीव गमावले जातात. विद्यार्थ्यांना वाहतुकीचे सर्व नियम व रस्ते अपघात उपाययोजना यांची माहिती असणे काळाची गरज आहे. रस्ते अपघात कमी करून नागिरकाचे जीवन सुरिक्षत ठेवणे हा या सर्व नियमावली मागील उद्देश आहे. या परिसंवादाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.एस.पी.जोकार यांनी केले.

















