सांगली : सांगली अर्बन को-ऑप बँकेने यावर्षी ९२ व्या वर्षात पदार्पण केले असून २०२५-२६ या आर्थिक वर्षात रु २३०० कोटी मिश्र व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला रु १८ कोटी ढोबळ नफा झाला आहे अशी माहिती बँकचे अध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे यांनी दिली. बँकेच्या ठेवींमध्ये रु ११९ कोटीची वाढ होऊन एकूण ठेवी रु १३९६ कोटी झाल्या आहेत.तसेच कर्जा मध्ये रु १७२ कोटी इतकी वाढ होऊन रु ९३२ कोटी कर्जांचे वाटप झाले आहे. बँकेचा एकूण व्यवसायात वाढ होऊन तो रु. २३२८ कोटींचा झाला आहे. बँकेच्या एन.पी.ए मध्ये लक्षणीय घट होऊन ढोबळ एन.पी.ए २.६७ % इतका व निव्वळ एन.पी.ए चे प्रमाण केवळ ०.७८ % इतके राहिला आहे. रिझर्व बँकेच्या निकषाप्रमाणे सी.आर.ए.आर चे प्रमाण किमान १२ % आवश्यक आहे ते १४ % इतके झाले आहे. यावरून बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे असे बँकेचे अध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे यांनी सांगितले.
बँकेस मोबाईल बँकिंग सुरु करण्यास रिझर्व बँकेकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जून महिन्यात बँकेच्या खातेदारांना मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोबाईल बँकिंग मुळे बँकेचे ग्राहक घरबसल्या या सेवेद्वारे आपल्या मोबाईल फोनवरून आपल्या खात्याची तपासणी, बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे आणि इतर बँकिंग कार्ये करू शकतात.
कुसुम योजनेनंतर्गत सोलर फार्मिंग विशेष कर्ज योजनेतून तसेच सोनेगहाण व वाहन खरेदीसाठी कर्ज वाटप केल्याने कर्ज व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. फ्लॅट / घर खरेदी साठी गृह कर्ज, शेतकरी वर्गासाठी “एस.यु.बी (SUB) किसान” विशेष कर्ज योजना, डॉक्टरांसाठी धन्वंतरी, तसेच फेस्टिवल कालावधीसाठी कार लोन ८.२० % आणि होम लोनचा व्याजदर ७.७५% ठेवल्याने कर्जात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या विविध सबसिडी स्कीम (योजनांचा) लाभ बँकेच्या कर्ज खातेदारांना झाला आहे. या कर्ज योजनांचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग झाला आहे.
एन.पी.ए मधील कर्ज वसुलीसाठी कर्ज मॉनेटरिंग, वसुली विभागाने व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. बँकेने लाइफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स व हेल्थ इन्शुरन्स व्यवसायास ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विमा व्यवसाय विभागातील कर्मचारी यांनी यासाठी विशेष योगदान दिले आहे. व्यवसाय वाढीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, मार्केटिंग विभाग, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. या सर्वामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होण्यासाठी मदत झाली.
बँकेच्या एकूण प्रगतीमध्ये माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष गणेश गाडगीळ यांचे मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष संजय पाटील व सर्व सहकारी संचालक, व्यवस्थापन मंडळ सदस्य यांची मोलाची मदत व सहकार्य मिळाले आहे. तसेच बँकेच्या वरील नमूद आर्थिक स्थितीमुळे यावर्षीही लाभांश देणे, शाखा विस्तार करणे आणि ग्राहकांसाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सेवा देणे शक्य होणार आहे असेही अध्यक्ष खिरे यांनी सांगितले.

















