सोलापूर : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सोलापूर तसेच महात्मा फुले समाजसेवा मंडळ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालविवाह थांबविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका ‘ या विषयावर हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींचे शिक्षण, बालहक्क आणि बालविवाह रोखण्यासाठी समाजाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. बालविवाह ही सामाजिक समस्या असून ती रोखण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रा. दिपक क्षिरसागर यांनी बालविवाह रोखण्यासाठी फक्त शिक्षकच नाही तर समाजातील प्रत्येक घटकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे यासाठी समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश कांबळे यांनी बालविवाह रोखण्यासाठी शिक्षकाबरोबरच विद्यार्थ्यांनीसुद्धा एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असल्यास न घाबरता तात्काळ प्रशासनास कळविले पाहिजे असे आवाहन केले .
शाळा समिती अध्यक्ष सुरेश बाबू मंकणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख पाहुणे जिल्हा महिला बालविकास अधिकारी अविनाश मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात, चाइल्ड लाइन समन्वयक आनंद ढेपे, महात्मा फुले समाज सेवा मंडळ अध्यक्ष प्रमोद झिंगाडे, प्राचार्य प्रकाश कांबळे, उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, आप्पासाहेब राऊत, कार्याध्यक्ष प्रमोद चुंगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांना बालविवाह न करण्याची व बालविवाह होऊ न देण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.























