सोलापूर – शासकीय सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासोबतच गावांच्या स्थानिक गरजा ओळखून विकासाला लोकसहभागाची जोड देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेत ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात झाली. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, केवळ योजनांची माहिती देण्याऐवजी प्रत्यक्ष लाभ आणि प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर राहणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजित पवार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
अभियानाचा केंद्रबिंदू नागरिक सेवा असून, विविध दाखले व प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित सेवा व कामांचा शक्य तितका निपटारा करून ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन आहे.
अभियानाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतींमध्ये ‘सेवा संकल्प ग्रामसभा’ घेण्यात येणार आहे. यामध्ये गावातील प्राधान्याच्या विकासकामांपासून स्थानिक समस्यांपर्यंत विविध विषयांवर चर्चा करून पुढील उपक्रमांचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
शाळा व अंगणवाड्यांमधील पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता, संरक्षण भिंत, परसबाग आणि दुरुस्तीची कामे लोकसहभागातून व विविध योजनांच्या अभिसरणातून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर जलस्रोत स्वच्छता, नळजोडणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य दिले जाणार आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्वच्छता महाश्रमदानात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बिबीदरफळ व अकोलेकाटी परिसरात सुरू असलेल्या श्रमदानाच्या उपक्रमांचा उल्लेख करत ‘एक दिवस स्वच्छतेसाठी द्या’, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी अभियानासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे कौतुक केले. महिनाभर विविध उपक्रम राबविताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रत्यक्ष परिणाम दिसेल अशा पद्धतीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी केले. शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिव जाधव यांनी केले, तर आभार सूर्यकांत भुजबळ यांनी मानले.
कोट १
‘गावासाठी एक दिवस’; श्रमदानातून बदल
अभियानातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘गावासाठी एक दिवस’ ही संकल्पना. प्रत्येक आठवड्यात किमान एक दिवस ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, ग्रामस्तरीय समित्या, स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून श्रमदान केले जाणार आहे. स्वच्छता, जलस्रोतांची निगा, शाळा-अंगणवाडी परिसर सुधारणा, वृक्षसंवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण यांसारख्या कामांना यातून गती दिली जाणार आहे.
– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
चौकट १
अधिकारी-कर्मचाऱ्यांना समन्वयाचे आवाहन
अध्यक्ष दीपक वैद्य यांनी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अभियानाची प्रभावी आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीनुसार सक्रिय सहभाग घेऊन अभियानाला यशस्वी करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौकट २
चार आठवड्यांत चार विकाससूत्रे
महिनाभराचे अभियान चार प्रमुख टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात सुशासन व नागरिक सेवा, दुसऱ्या आठवड्यात शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी आणि सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण, तिसऱ्या आठवड्यात जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, तर चौथ्या आठवड्यात आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण व उपजीविका या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
Post Views: 10