सांगोला – शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी मागणी भाजपचे सांगोला सरचिटणीस सिद्धेश्वर गाडे यांनी निवेदनाद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. सदर निवेदन त्यांचे विशेष कार्यसन अधिकारी संतोष साखरे यांनी स्वीकारले. यावेळी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रशम कोल्हे, जिल्हा संयोजक प्रशांत शिंपी, डॉ.बी.पी.रोंगे, सरचिटणीस अमोल साखरे उपस्थित होते.
या निवेदनात नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांना पहिली तीन वर्षे अल्प वेतनावर असणारी शिक्षणसेवक ही योजना बंद करणे, २००५ पूर्वी अस्तित्वात असणारी जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षकांना लागू करणे, विनाअनुदानित व तासिका तत्त्वावरील शिक्षक अत्यल्प मानधनावर काम करतात त्यांचे मानधन वाढवून त्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवणे, सेवेत असणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक कामाबरोबर वारंवार होणारी ऑनलाइन व प्रशासकीय अतिरिक्त कामे बंद करणे, शाळांमध्ये मूलभूत सुविधा व डिजिटल साधनांची पूर्तता करणे, शिक्षक भरती प्रक्रिया उन्हाळी सुट्टीत पूर्ण करणे, तसेच शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे त्याचबरोबर सेवेवर असणाऱ्या शिक्षकांना कामाचा प्रचंड व्याप लागत असल्याने रिक्त पदे त्वरित भरणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

























