जपून जपून जा रे! पुढे धोका आहे….
अजब स्मार्ट सिटीचा गजब कारनामा : वाहनधारकांना वाहन चालवणे बनले कसरतीचे
सम्राट चौक रस्त्यावर दुचाकी स्लीप होत असल्याने लावला सावकाश जाण्याचा फलक
त.भा.वृत्तसेवा
सोलापूर दि ४ जुलै – अजब स्मार्ट सोलापूरचा गजब स्मार्ट कारभार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असताना , अधिकारी कर्मचारी मात्र अळीमिळी गुपचिळी या भूमिकेत आहेत.
शहरात विविध प्रकारचे समस्या डोके वर काढत आहेत, त्यामध्ये रस्त्यांची झालेली चाळण होय. शहराच्या प्रमुख शहरी भागातील सम्राट चौक रस्त्यावर दुचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते आणि अशावेळी प्रभाकर महाराज मंदिराजवळ दुचाकी स्लीप होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत.
रस्त्यांवरील खड्डे, खड्ड्यात साचलेले पाणी,पाण्यातून चिखल निर्माण होऊन दुचाकी घसरून अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अपघात होत असल्यामुळे याठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध एक लोखंडी खुर्चीवर फलक लावला आहे. त्यावर” सावकाश जावा गाडी स्लीप होत आहे” असे लिहले आहे. हा फलक वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान सम्राट चौक रस्त्यावर वारंवार चेंबर ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी वाहून खड्ड्यात साचत आहे. अशावेळी वाहनधारकांची खड्ड्यातून आणि चिखलग्रस्त रस्त्यावरून वाहन चालवणे जणू तारेवरची कसरतच बनून गेले आहे. या रस्त्यावरून अनेक शाळकरी मुले, कामाकरीता जाणारे व्यक्ती , एसटी बसेस , रिक्षा ये जा करत असतात. सदरचा रस्ता हा नेहमी रहदारीचा असल्याने गाड्या स्लीप होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. याकडे पालिका प्रशासन आणि संबंधित विभागीय कार्यालयाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रस्त्यांच्या बाजूला मातीचे ढिगारे , मोठं मोठे दगड
, ड्रेनेजचे सांडपाणी , चिखल साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत ये जा करावी लागत आहे. पादचाऱ्यांना देखील रस्त्यावरून जाताना आपला पाय चीखलवरून घसरून जाऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी लागते आहे. अशा या धोकादायक रस्त्यावरून जाताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावं लागतं आहे. वाहन स्लीप होऊन खाली पडल्यानंतर मागील वाहन धडक देईल याची भीती नागरिक आणि वाहनधारकांना सतावते आहे.
लोखंडी खुर्चीवर लावला फलक…..
स्मार्ट सिटीच्या स्मार्ट रस्त्यावरून जाताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून जावे लागते आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते केच कळेनासे झाले आहे. खड्डेमय रस्त्यावरून अनेक वाहने घसरली जाऊन अपघात होत आहेत. अपघाताचा केंद्रबिंदू ठरलेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी लोखंडी खुर्चीवर एक फलक लावला आहे. त्यावर खडूने सावकाश जावा गाडी स्लीप होत आहे असे लिहलेले दिसून आले आहे. सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकांचे हा फलक लक्ष वेधून घेत आहेत.
संबंधित विभागीय कार्यालयाचे दुर्लक्ष..
पावसाळ्यात या भागात नेहमी पाणी साचून राहते. एखाद्या तलाव सारखे पाणी साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. याकडे संबंधित विभागीय कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पहिल्या पावसात पाणी साचल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली परंतु त्यानंतर ठोस उपाययोजना केल्या नाहीत.
कसली स्मार्ट सिटी आहे हेच कळेनासे झाले आहे.
स्थानिक रहिवासी ,