सोलापूर : आर्द्रा नक्षत्रातील पहिल्याच मुसळधार पावसाने काल सोलापूर शहराची दाणादाण उडवली. अवघ्या काही तासांच्या पावसात शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर जागून पाणी उपसावे लागले. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकी, रिक्षा आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहने बंद पडली. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येमुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नवीपेठ, मधला मारुती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दक्षिण कसबा, बाळीवेस, अक्कलकोट रस्ता, मल्लिकार्जुन नगर, आमराई, सैफूल चौक, पोटफाडी, भागवत टॉकीज, काळी मशीद परिसर आदी भागांत गुडघाभर पाणी साचले होते. महेश कॉलनी, सम्राट चौक आणि बारामोरी परिसराला तर अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. पाथरूट चौक–पोटफाडी चौक, पद्मशाली चौक, कोंतम चौक, कन्ना चौक, कुंभार वेस–भवानी पेठ तसेच आसरा चौक–किनारा हॉटेल मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने अनेक वाहने बंद पडली. गणेश शॉपिंग सेंटर परिसर आणि साखर पेठ विहिरीपर्यंतचा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंदच झाला होता.
थोबडे वस्ती, साठे वस्ती, आमराई, गवळी वस्ती, वज्रेश्वरी नगर तसेच दोन नंबर झोपडपट्टी, बहुरूपी नगर आदी भागांमध्ये ड्रेनेज तुंबल्याने घरांत पाणी शिरले. अनेक कुटुंबांना रात्रभर पाणी बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागली. ही दरवर्षीचीच समस्या असून कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी,अशी मागणी नागरिकांनी केली.
महापालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनावर
नागरिकांनी नाराजी
नवीपेठ, बाळीवेस, दक्षिण कसबा, आमराई, सम्राट चौक, बारामोरीसह अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले. थोबडे वस्ती, साठे वस्ती, गवळी वस्ती, वज्रेश्वरी नगर आदी भागांतील नागरिकांना रात्रभर पाणी उपसावे लागले. अनेक मार्गांवर पाण्याचा वेग वाढल्याने दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहने बंद पडली.
पहिल्याच पावसात शहर जलमय झाल्याने महापालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
Post Views: 10