सोलापूर – सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळ संचलित समर्थ विद्यापीठाच्यावतीने समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्यावर आधारित विविध वयोगटासाठी विविध परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेमध्ये सोलापुरातील चौघांनी प्रौढ गटातील परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे.
या परीक्षांमध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरचे उपाध्यक्ष दत्ता आराध्ये हे समर्थ बोध ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. भारत पेट्रोलियम मधील निवृत्त अधिकारी सुनील माढेकर हे मनोबोध विशारद ही परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. सेवासदन शाळेतील शिक्षिका योजनगंधा जोशी या मनोबोध विशारद ही परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर दयानंद महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक दीपक निमकर हे मनोबोध विशारद ही परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यापीठाचा पदवीदान समारंभ नुकताच सज्जनगड येथे कुलपती समर्थ भक्त शेंबेकरबुवा रामदासी, सचिव समर्थ भक्त कुलसचिव योगेशबुवा रामदासी आणि उपकुलसचिवा प्राची भिडे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी या चौघांचाही उपकुलसचिव प्राची भिडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच या परीक्षार्थींना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या चौघांच्याही यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. समर्थ विद्यापीठाच्या विविध परीक्षांसाठी महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश अशा विविध राज्यातून सुमारे अकराशे समर्थ भक्तांनी सहभाग घेतला होता.
Post Views: 8