सोलापूर – सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी अत्यंत कठीण परिस्थिती असताना मार्च – २०२६ अखेरीस बँकेने रु. १००० कोटी मिश्र व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. अशी भावना बँकेचे मार्गदर्शक श्री. राजशेखर शिवदारे यांनी व्यक्त केले. बँकेने रु. १००० कोटी रुपयाचा मिश्र व्यवसाय पार पाडल्या निमित्त आयोजित केलेल्या प्रसंगी ते बोलत होते. जगातील युद्धजन्य परिस्थितीमुळे बँकिंग क्षेत्राला पुढील काळात फार जपून काम करावे लागणार आहे. परंतु सिद्धेश्वर बँकेची व्यवसाय करण्याची पद्धत पाहता या बँकेस व्यवसाय वाढीची संधी उपलब्ध असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय घाळे यांनी दि. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या आर्थिक व्यवहाराचे विवेचन सादर केले. ठेवी रु. ६०१.९७ कोटी, कर्जे ४१८.६३ कोटी, ढोबळ नफा रु. १०
कोटी ५० लाख, असून नेट एनपीए ०% असल्याची माहिती सादर केली.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बँकेच्या ठेवी ६० कोटी रुपयांनी वाढल्या आहेत. हे जनतेने सिद्धेश्वर बँकेवर दाखविलेल्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे चेअरमन श्री. नरेंद्र गंभिरे यांनी सांगितले. त्यांनी सर्व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले. यासाठी मार्गदर्शक श्री. राजशेखर शिवदारे यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे सहकार्य व सेवक वर्गानी उपसलेले कष्ट सहाय्यभूत ठरले असे प्रतिपादन केले.
बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे सदस्य श्री. मल्लिनाथ दुलंगे यांनी आपल्या मनोगतात बँकेने रु. १००० कोटीचा मिश्र व्यवसायाचा टप्पा पार केला तो फार महत्वाचे असल्याचे सांगितले.
सभासदांनी, ठेवीदारांनी सिद्धेश्वर बँकेवर दाखविलेला विश्वास कायम राखण्यास ही बँक कटिबद्ध असल्याचे मत बँकेचे तज्ञ संचालक श्री. राजन रिसबूड CA आणि इतर संचालकांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन सौ. सुचेता थोबडे, संचालक श्री. अशोक लांबतुरे, श्री. पशुपतीनाथ माशाळ, सौ. रुपाली बिराजदार, अॅड. मल्लिनाथ पाटील, श्री. शिवानंद कोनापुरे, श्री. भीमाशंकर म्हेत्रे, श्री. सिद्धेश्वर मुनाळे, श्री. महेश सिंदगी, अॅड. धानय्या चिवरी, सेवक प्रतिनिधी श्री. राजेश कलशेट्टी, श्री. बसवराज कोरवार आणि सरव्यवस्थापक श्री. राम शर्मा हे उपस्थित होते.



















