सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2025-26 चा 22 वा दीक्षांत समारंभ गुरुवार, दि. 30 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत प्रांगणात होणार असून यावेळी एकूण 11 हजार 851 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याचबरोबर 162 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण ५७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच एप्रिल – मे, २०२६ चा निकाल मुदतीत जाहीर करून त्याचे पदवीदान समारंभ निकालानंतर केवळ १ महिन्यात आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
महामहिम राज्यपाल तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा हे दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदारडॉ. विनय सहस्त्रबुध्दे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करतील. याप्रसंगी पद्मभूषण प्रा. डॉ. जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना डी. एस्सी. तर पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे यांना डी. लिट. ही सन्मान्य पदवी देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार आहे.
गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल. या समारंभात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा व आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल. दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे.
——-
सुवर्णपदकामध्ये मुलीच आघाडीवर
सुवर्णपदके पटकावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. यात 44 मुली आणि ते 13 मुले तर पीएचडी मध्ये 56 मुली व 106 मुले आहेत.
Post Views: 3