सोलापूर : येथील श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ आणि एस. एस. साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयात भव्य शिवमहापुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिंतूर येथील अमृतेश्वर मठाचे ष.ब्र. श्री १०८ स्वरसम्राट श्री अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतमय वाणीतून संगीतमय शिवमहापुराण कथेचे निरूपण होणार असल्याची माहिती उत्सवाध्यक्ष वेदमूर्ती इरण्णा मठपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आषाढ मासानिमित्त व विश्वकल्याणार्थ आयोजित या महोत्सवाचा प्रारंभ ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता श्री कामेश्वर व गणेश यांचा रुद्राभिषेक, त्यानंतर सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाने होईल. सकाळी ११ वाजता ज्ञानसिंहासनाधीश्वर काशीजगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांच्या पावन सान्निध्यात उत्तर कसबा येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून शिवानुभव मंगल कार्यालयापर्यंत ग्रंथ दिंडी व सुहासिनी जलकुंभ मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिंडीनंतर सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथेचा शुभारंभ होईल.
महोत्सवानिमित्त १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता ‘वीरशैवागमन वेदोक्त शिवपूजा विधी’ ग्रंथाचे प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार, २ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर, तर ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिवमहापुराण कथेची सांगता आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.मंडळाचे संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री होळीमठ आणि अध्यक्ष वेदमूर्ती बसवराज शास्त्री पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक महोत्सव होत असून, विविध मठांचे शिवाचार्य, संत-महंत, लोकप्रतिनिधी तसेच हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन योगिराज होळीमठ यांनी केले.
पत्रकार परिषदेस मंडळाचे सदस्य योगिराज होळीमठ,
उपाध्यक्ष प्रशांत स्वामी, रतिकांत स्वामी, केदार स्वामी, केदार ओ. स्वामी तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Post Views: 5