
सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर रंगलेल्या ‘विजय ट्रॉफी ‘ सुपर नॉकआउट क्रिकेट सामन्यात ‘साऊथ सोलापूर ब्लू’ संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘मॉडेल सीए’ संघाचा ९८ धावांनी धुव्वा उडवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या साऊथ सोलापूर ब्लू संघाने ३९.४ षटकांत सर्वबाद २७७ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. यामध्ये निरंजन कदम याने अवघ्या ६७ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची वादळी खेळी केली. त्याला अमीर खान (६६ चेंडूंत ७८ धावा) आणि यश गोपाळ (५४ धावा) यांनी दमदार अर्धशतकी खेळी करत मोलाची साथ दिली.
२७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॉडेल सीए संघाला निर्धारित ४० षटकांत ७ बाद १७९ धावांपर्यंतच मजल मारता आली. साऊथ सोलापूर ब्लूच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर मारा करत विरोधी फलंदाजांना जखडून ठेवले. जोतिबा चव्हाण याने ४६ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. तर श्रीनिवास कुलकर्णी याने ८ षटकांत अवघ्या २१ धावा देत ३ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या किफायतशीर आणि भेदक गोलंदाजीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
Post Views: 5