धाराशिव : धानोरा, ता. धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी पिकाच्या नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली.
पाहणीदरम्यान अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे पीक उभे असले तरी शेंगा अत्यल्प असून काही ठिकाणी जवळपास पूर्ण नुकसान झाल्याचे चित्र दिसत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. ज्या ठिकाणी थोड्याफार शेंगा लागल्या आहेत, तेथेही दाणे पूर्णपणे भरलेले नसून त्यांची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून मशागत, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर पैसे खर्च केले आहेत. मात्र, पिकाची अशी अवस्था झाल्यामुळे संपूर्ण वर्षाच्या कष्टांवर संकट आले असून शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती उरणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे डॉ. पाटील यांनी म्हटले.
शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून परिस्थितीची भीषणता स्पष्ट होत असल्याचे सांगत डॉ. पाटील यांनी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. पंचनामे, कागदोपत्री अटी आणि प्रशासकीय विलंब यामध्ये वेळ न घालवता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शासनाकडे प्रमुख मागण्या
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ₹१ लाख नुकसानभरपाई द्यावी.
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा.
जनावरांसाठी तातडीने चारा डेपो सुरू करावेत.
पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
पीक नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे जलदगतीने पूर्ण करून मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करावी.
शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने त्यांच्या कष्टांचा आणि संकटाचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली.





















