अक्कलकोट : अक्कलकोट शहरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी, नागरिक आणि मूक जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्याचे जवळपास तीन महिने उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या संकटातून दिलासा मिळावा आणि अल्लाहची रहमत म्हणून समाधानकारक पाऊस बरसावा, यासाठी आज अक्कलकोट शहरातील शाही ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का पठाण करण्यात आली.
पावसासाठी अदा करण्यात येणारी दोन रकात विशेष नमाज श्रद्धेने पार पडली.
नमाजनंतर खुतबा पठण करण्यात आले त्यानंतर अक्कलकोट शहरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तसेच देशातील ज्या-ज्या भागात पावसाची कमतरता आहे, त्या सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस पडावा,यासाठी अल्लाहकडे विशेष दुआ करण्यात आली.
या विशेष नमाज व दुआसाठी लहान मुले, तरुण, वयस्कर व्यक्ती तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने शाही ईदगाह मैदानावर उपस्थित होते पावसासाठीच्या या सामूहिक नमाज व दुवा प्रार्थनेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पावसाची आस आणि मनात अल्लाहच्या रहमतीची अपेक्षा दिसून आली.
यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळावे, शेतीला आवश्यक पाणी मिळावे, मूक जनावरांना चारा-पाणी उपलब्ध व्हावे आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटातून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी आर्त दुआ करण्यात आली.
देशात सुख-शांती, प्रेम, आपुलकी व बंधुभाव कायम राहावा, सर्व धर्मीयांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करावा आणि सर्व सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठीही विशेष प्रार्थना करण्यात आली.
इस्लामच्या शिकवणीनुसार जेव्हा समाजात पापांचे प्रमाण वाढते, तेव्हा त्याचा परिणाम अल्लाहच्या रहमतीवरही होतो, असे मानले जाते. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या पापांची मनापासून तौबा (पश्चात्ताप) करून अल्लाहकडे क्षमा मागावी आणि त्याच्याकडे रहमत म्हणून पावसाची याचना करावी, अशी पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांची शिकवण आहे. त्यानुसार ‘सलातुल इस्तिस्का’ ही विशेष नमाज अदा केली जाते. या नमाजनंतर संपूर्ण देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, शेतशिवार हिरवेगार व्हावेत, जलस्रोत तुडुंब भरावेत आणि अल्लाहने संपूर्ण सृष्टीवर आपली कृपा करावी, अशी सामूहिक दुवा मौलाना यांनी केली.
पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांच्या आशा या सामूहिक दुआतून व्यक्त झाल्या. अल्लाह तआला आमच्या दुआ कबूल फरमावो,अक्कलकोट शहरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर रहमतचा पाऊस बरसवो आणि शेतकरी नागरिक व मूक जनावरांना या संकटातून दिलासा देवो अशी भावपूर्ण दुआ यावेळी करण्यात आली अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली.
Post Views: 15