सोलापूर – एकीकडे रब्बी हंगामाच्या तोंडावर ऊसाला रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) मिळावा म्हणून ठिकठिकाणी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलने पेटली आहेत. मात्र, दुसरीकडे पावसाने दगा दिल्यामुळे आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने उभ्या ऊसाचे वजन घटू लागले आहे. या अशा विचित्र कात्रीत ऊस उत्पादक शेतकरी अडकला असून, आंदोलन पाठिंबा द्यावा की ऊस वाचवण्यासाठी तातडीने तोडणी करावी, अशा द्विधा मनस्थितीत सापडला आहे.
चालू वर्षात मान्सूनच्या लहरीपणामुळे अनेक भागांत जलसाठे कोरडे पडले आहेत. ऊसाला पाणी नसल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने शेतातील ऊस जळून जात आहे. ऊस जेवढा जास्त काळ शेतात राहील, तेवढा तो आतून पोकळ होत असून त्याच्या वजनात आणि रसाच्या प्रमाणात (रिकव्हरी) मोठी घट येत आहे. यामुळे दरवाढीचा फायदा मिळण्याआधीच वजनापोटी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे थेट नुकसान होत आहे.
अशा गंभीर परिस्थितीत कारखान्यांचे गाळप उशिराने सुरू झाल्याने किंवा आंदोलनामुळे तोडणी रखडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याचाच गैरफायदा ऊस तोडणी मजूर आणि मुकादम घेत असल्याचे चित्र आहे. ऊस तातडीने कारखान्याला घालवण्यासाठी शेतकरी घायकुतीला आल्यामुळे, अनेक तोडणी टोळ्यांकडून एकरी ५ ते १० हजार रुपयांची बेकायदेशीर ‘टोळी उचल’ किंवा ‘बोनस’ मागितला जात आहे. ऊस वाळून संपूर्ण नुकसान होण्यापेक्षा शेतकरी नाईलाजाने हा आर्थिक भुर्दंड सहन करत आहेत.
संघटनांची भूमिका आणि शेतकऱ्यांची वैयक्तिक अडचण
खते, बियाणे, मशागत आणि पाण्याचे वाढलेले दर पाहता शेतकरी संघटनांनी पुकारलेले आंदोलन पूर्णपणे रास्त आहे, अशी भावना सामान्य शेतकऱ्यांची आहे. परंतु, आंदोलनाचा काळ लांबल्यास शेत रिकामा होणार नाही आणि पुढील हंगामातील पिके घेता येणार नाहीत, अशी भीती त्यांना सतावत आहे.
“शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा!”
“पाणीटंचाईमुळे ऊस शेतातच वाळून वजनात घट होत असल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. त्यातच ऊस दराचा तिढा न सुटल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. संघटना म्हणून आमचा लढा शेतकऱ्याला रास्त भाव मिळवून देण्यासाठीच आहे; मात्र चालू दुष्काळी परिस्थिती पाहता कारखानदार आणि शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा. ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक तात्काळ थांबवून पारदर्शक पद्धतीने तोडणी सुरू करणे गरजेचे आहे.”
कॉ. जावेद आवटे, तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा, दक्षिण सोलापूर
…
आंदोलनही गरजेचं, पण डोळ्यादेखत ऊस जळताना पाहवत नाही!”
“वर्षभर रक्ताचं पाणी करून ऊस जगवला, पण आता पाऊसच नसल्यानं विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पाणी नसल्यामुळं शेतातील ऊस डोळ्यादेखत वाळू लागलाय आणि त्याचं वजन झपाट्यानं घटत आहे. चांगला दर मिळण्यासाठी शेतकरी संघटनांचं आंदोलनही गरजेचं आहे, पण दुसरीकडं ऊस कारखान्याला गेला नाही तर वजनात मार बसून आमचं कंबरडंच मोडणार आहे. त्यात तोडणी मजुरांकडून वाढीव पैशांची मागणी होत असल्यानं आम्ही पुरते हवालदिल झालो आहोत. दरही मिळावा आणि तोडही लवकर व्हावी, अशी आमची सध्या अडचण झाली आहे.”



















