अक्कलकोट : महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान विभागाचा निकाल 100% लागला असून यामुळे महाविद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. तज्ञ प्राध्यापकाकडून वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सातत्याने अभ्यासावर अधिक भर देत असल्यामुळे दरवर्षी विद्यालयाचा निकाल 100% लागत आहे. असे यावेळी संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आयोजित यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख पारितोषिक,शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, जुनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे हे उपस्थित होते.
विज्ञान शाखेतील यश बागलकोटी हा विद्यार्थी 74.67 % घेऊन प्रथम आला आहे. शंकर नीळ व कु राजनंदिनी ताकमोगे या दोघानी 73.33 % घेऊन द्वितीय तर सिद्धाराम कोरे हा विद्यार्थी 72 टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला विद्या शाखेचा निकाल 68.57 % लागला असून कु सपना चेंडके 78.83 घेऊन प्रथम आली, कु विजयालक्ष्मी चेंडके 66.67% घेऊन दुसरी तर कु महेक कारंजे 64.67 % घेऊन तिसरी आली आहे.
वाणिज्य विद्याशाखेचा 79.06 % निकाल लागला असून कु आदिती कटारे ही 75% मिळवून प्रथम आली, कु समीक्षा मोरे 73.83% मिळवून दुसरी तर कु स्नेहा भिकमळी 71.50% गुण मिळवून तिसरी आली आहे.
या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी , प्राध्यापक वर्ग व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
सूत्रसंचलन प्राध्यापक शिवकुमार मठदेवरू यांनी केले तर उपस्थितांचे आभार मधुबाला लोणारी यांनी मानले.


























