जेऊर – पुणे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आर्मी भरती परीक्षेसाठी आलेल्या करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांची महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग अवघ्या दोन तासांत परत मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चिंतपणे परीक्षा देता आली.
करमाळा तालुक्यातील वरकटणे येथील ज्ञानेश्वर जगताप, संकेत गरड आणि त्यांचे दोन मित्र आर्मी भरतीच्या परीक्षेसाठी पुण्यात आले होते. परीक्षा हडपसर येथे असल्याने सकाळी सातच्या सुमारास त्यांनी पुणे रेल्वे स्थानकावरून रिक्षाने हडपसरकडे प्रस्थान केले. मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की प्रवेशपत्र व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चुकून रिक्षातच राहिली आहे.
रिक्षाचा क्रमांक किंवा चालकाची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. कागदपत्रांशिवाय परीक्षा देता येणे शक्य नसल्यामुळे ते तातडीने पुन्हा पुणे रेल्वे स्थानकावर आले. तेथे त्यांनी रेल्वे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव तसेच करमाळा तालुक्यातील रेल्वे पोलिस हवालदार नवनाथ नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधला.
जाधव व नाईकनवरे यांनी वाहतूक विभागातील सहकारी एस. के. सावंत यांच्या मदतीने रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा चालक व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रिक्षाचालकांच्या व्हॉट्सॲप समूहांवर विद्यार्थ्यांच्या हरवलेल्या बॅगेबाबत संदेश प्रसारित करून बॅग परत करण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलिसांच्या या प्रयत्नांना यश मिळत अवघ्या अर्ध्या तासात संबंधित रिक्षाचालक कागदपत्रांची बॅग घेऊन रेल्वे स्थानकावर हजर झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची बॅग सुखरूप परत मिळाली.
रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि रेल्वे पोलिसांच्या तत्पर मदतीमुळे विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता होणाऱ्या आर्मी भरतीच्या परीक्षेला वेळेत पोहोचता आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मदत करणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि रिक्षाचालकांचे मनापासून आभार मानले.
Post Views: 6