सांगोला – कृष्णा, कोयना, पंचगंगा, भीमा आणि नीरा नदीतील पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित टेंभू उपसा सिंचन योजना तसेच म्हैसाळ योजना व निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्यातील माणगंगा व कोरडा या प्रमुख नद्यांसह स्थानिक ओढे, नाले आणि तलावात सोडून मायबाप सरकारने बळीराजाची तहान आणि जनावरांची भूक भागवावी अशी मागणी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली. ते सांगोला तहसीलदार बाळूताई भागवत यांना लेखी निवेदन देते वेळी बोलत होते. याप्रसंगी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगोला तालुक्यासाठी वरदान असणाऱ्या टेंभू, म्हैसाळ व निरा उजवा कालवा या सिंचन योजनामधून तालुक्यातील माणगंगा, कोरडा, बेलवन, आफ्रुका या नद्यांसह स्थानिक ओढे, नाले त्याचबरोबर सांगोला शाखा कालवा फाटा ४ आणि ५ तसेच पारे, हंगीरगे, घेरडी, जवळा, चिंचोली, बुद्धेहाळ, तिसंगी आणि राजेवाडी यांसह छोटे-मोठे तलाव भरून दिल्यास सांगोला तालुक्यात असणारी भीषण पाणीटंचाई दूर होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजासह कृषीधन आणि पशुधन यांना जीवदान मिळण्यास मदत होणार असल्याचे दिपकआबा साळुंखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
चौकट-
जनावरे भुकेली, बळीराजाही तहानलेला..!
शेती आणि पशुपालन हे सांगोला तालुक्यातील दोन प्रमुख व्यवसाय आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे. परिणामी शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आला आहे. त्याचबरोबर तालुक्यात प्रचंड चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुपालन हा व्यवसायही प्रचंड संकटात सापडला आहे. जनावरांची भूक आणि बळीराजाची तहान भागवण्यासाठी सांगोला तालुक्याला तत्काळ पाणी सोडावे.
-माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील