बार्शी – दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पहाटे येथील श्री भगवंत मंदिरात भक्तिसंगीताचा सुरेल आविष्कार अनुभवायला मिळाला. नादब्रह्म संगीत क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पाडवा पहाट’ या विशेष संगीत कार्यक्रमात विद्यार्थी आणि गायकांनी सादर केलेल्या भक्तिगीत, अभंगवाणी आणि भावगीतांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात झालेल्या या संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात बसवराज पुरवंत यांनी ‘लंबोदरा हे विघ्नेश्वरम’ या गणेशगीताने केली. त्यानंतर सिया चौबे यांनी ‘हा मोगरा’, लता बांगर यांनी ‘पंढरीशी जारे आल्यानो संसारा’, भोसले यांनी ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’, मीरा मांजरे यांनी ‘देहाची तिजोरी’, वैशाली देशमुख यांनी ‘कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात’, रुद्र मांजरे यांनी ‘अबीर गुलाल’, लोळगे यांनी ‘कैवल्याचा पुतळा’, मेघना वाघमारे यांनी ‘चिंधी बांधते’, बसवराज पुरवंत यांनी ‘राम गुणगान करी’ तर ओजस्वी राऊत यांनी ‘हे आदिमा हे अंतिमा’ ही भक्तिगीते सादर केली.
मयांक सर्वज्ञ यांनी ‘पायोजी मैंने रामरतन धन’ या गीताचे हार्मोनियम वादन केले. वैशाली सोनवणे यांनी ‘कधी लागेल रे वेड्या’, कातूरे यांनी ‘दर्शन दे रे देर भगवंता’, प्रतीक्षा अंधारे यांनी ‘पाहिला पाहिला नंदाचा नंदन’ ही गीते सादर केली. सावंत, देशमुख, भोसले, चौबे आणि ओजस्वी यांनी समूहाने ‘माझी रेणुका माऊली’ हे गीत सादर करून वातावरणात भक्तिभाव निर्माण केला.
रुद्र मांजरे यांनी ‘हरिभजनाविण काळ’ हा अभंग सादर केला. आराध्या माळी, ओजस्वी राऊत, राजवीर भोसले, शिवन्या कोंढारे, रुद्र मांजरे आणि शिवरत्न मांजरे यांनी ‘अच्युतम केशवम्’ हे स्तुतिगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या सादरीकरणाला पार्थ पाबळे यांनी तबल्याची, तर मयंक क्षीरसागर यांनी हार्मोनियमची साथ दिली. मृणाली सराफ यांनी ‘काय सांगू आता संतांचे उपकार’ हा अभंग सादर केला.
कार्यक्रमाचे प्रमुख गायक निलेश मांजरे सर यांनी ‘बाजे मुरलिया बाजे’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ यांसह विविध अभंगांचे सादरीकरण करून रसिकांना भक्तिरसात चिंब केले. ‘पोटापुरते देई बा विठ्ठला’ या भावस्पर्शी भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण कार्यक्रमात रितेश काजळे यांनी तबल्याची, सुदर्शन शिराळकर आणि दिपाली सहस्रबुद्धे यांनी हार्मोनियमची, तर सुहास जोशी यांनी टाळाची साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन बसवराज पुरवंत यांनी केले.
नादब्रह्म संगीत क्लासेसच्या विद्यार्थीवृंदाने सादर केलेल्या या भक्तिसंगीत सोहळ्यामुळे दिवाळी पाडव्याच्या पहाटेला श्री भगवंत मंदिर परिसरात भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.