सोलापूर – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांच्यासह शुक्रवारी विभागीय कार्यालय आणि वाचनालयाची पाहणी केली. या पाहणीत कार्यालयाची दुरवस्था, गैरहजर कर्मचारी आणि अपुऱ्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी पापुद्रे निघालेले छते, अपुऱ्या सुविधा आणि अस्ताव्यस्त अवस्थेतील वाचनालय पाहून अध्यक्षांचा पारा चढला, अन् उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या पाहणीवेळी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी विभागाच्या कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगत कार्यालय आणि वाचनालयाच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीची मागणी केली. कार्यालयीन वेळेत काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येताच अध्यक्ष दीपक वैद्य यांनी नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला. प्रभारी समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी विभागातील विविध अडचणी, मनुष्यबळाची कमतरता आणि सुरू असलेल्या योजनांबाबत माहिती देत प्रशासनाची बाजू मांडली. मात्र, नागरिकांना वेळेवर सेवा मिळण्यासाठी उपस्थिती आणि कामकाजात शिस्त राखणे आवश्यक असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. अंगणवाडी केंद्रांच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच ग्रामीण भागातील मुलींना सायकली आणि इतर शैक्षणिक सुविधा पुरविण्याच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती दिली. नव्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागांतील सुविधा सुधारून योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असा स्पष्ट संदेश या पाहणी दौऱ्यातून देण्यात आला.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...