पंढरपूर – आषाढी, कार्तिकी वारीचे नियोजन करताना व्हीआयपी दर्शन बंद करण्यात यश आल्यामुळे दर्शन रांगेतील हजारो वारकऱ्यांना फायदा झाला असल्याचे मोठे समाधान मिळाल्याचे मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रूक्मिणी दर्शन घेतल्यानंतर सांगितले.
नागपूर येथे आशीर्वाद यांची बदली झाली असून सोलापूर सोडण्यापूर्वी त्यांनी पंढरीत येऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह विविध मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या तसेच नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक संदेश भोसले, राजेंद्र सुभेदार आदी उपस्थित होते.
दरम्यान यात्रांच्या काळात आठ दिवस पंढरपूर येथे कुमार आशीर्वाद हे मुक्काम करून वारकऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर जातीने लक्ष ठेवून असत. आपल्या कामातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
गेल्या अडीच वर्षांत कोणते मोठे काम केल्याचे समाधान आहे या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आशीर्वाद यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर येथे विमानसेवा सुरू करणे, उजनी जलपर्यटन, आयटी पार्क या कामांना गती देण्यात यश आले असले तरी पंढरपूर वारीचा वेगळाच अनुभव आहे. येथे देवाच्या दर्शनासाठी वारकरी तासनतास दर्शन रांगेत उभे असतात. वारी काळात मोठ्या प्रमाणात व्हीआयपी दर्शन सुरू असते. या दर्शनामुळे वारकऱ्यांच्या दर्शनास विलंब लागतो. हे लक्षात आल्यावर प्रथम मंदिराचे व्हीआयपी गेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच या दर्शनावर मोठ्या प्रमाणात अंकुश ठेवण्यात यश आले. यामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी लागणारे तास कमी झाले. यामुळे आपल्याला मोठे समाधान मिळाल्याची भावना आशीर्वाद यांनी व्यक्त केली.
——————-
पंढरपूर कॉरिडॉरला निधी कमी पडणार नाही
पंढरपूर कॉरिडॉरला चार हजार कोटी रूपयांच्या कामाला निधी मिळणार का, असा प्रश्न करताच त्यांनी, या कामाला निधीची कमतरता पडेल किंवा निधी रोखला जाईल असे मला वाटत नाही. तसेच पंढरपूर शहराकडे येणाऱ्या सात रस्त्यांसाठी साडे तीनशे कोटींहून अधिकचा निधी मिळाला असून याचादेखील फायदा होणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.


















