धाराशिव : पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात, आनंदी आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाच्या बाललीला, भारतीय संस्कृती आणि परंपरांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा, गोप-गोपी आणि विविध पौराणिक व्यक्तिरेखांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, मुकुट, मोरपिसे आणि दागिन्यांनी सजलेले चिमुकले राधा-कृष्ण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थना, सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते चिमुकल्या बाळ गोपाळांनी साजरा केलेला दहीहंडी सोहळा. दहीहंडीचा आनंद घेताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कृष्णमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण शाळा परिसर आनंदाने आणि उत्साहाने भरून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील मूल्ये, प्रेम, मैत्री, आनंद आणि भारतीय संस्कृती-परंपरांचे महत्त्व अनुभवता आले. चिमुकल्या राधा-कृष्णांच्या निरागस सहभागामुळे जन्माष्टमीचा सोहळा अधिकच अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका व कार्यक्रमाधिकारी सुप्रिया राहिगुडे मॅडम यांनी अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडले. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





















