सोलापूर – सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट ॲन्ड एक्टिविटीज (सी वाए डी ए) पुणे आणि सोलापुरातील सपोर्ट फाउंडेशन या समविचारी सामाजिक संस्थांच्या वतीने सोलापुर शहर व परिसरातील बेरोजगार व गरजू महिला व युवक यांच्यासाठी कौशल्य विकास प्रकल्प राबविला जात आहे. सोलापूर शहर व परिसरातून रोजगारासाठी पुणे -मुंबई सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर आजही चालू आहे. एकल विधवा महिलांना तर रोजगार मिळणे दुर्मिळ झाले आहे. म्हणून सी वाए डी ए व सपोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने सोलापूर शहरातील गरजू महिलाना रोजगार मिळावा, रोजगारासाठी त्यांना स्थलांतर करावे लागू नये यासाठी 18 ते 35 वयोगटातील युवक/ युवती तसेच महिला यांना विविध कोर्स चे प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जॉब सुद्धा मिळवून दिला जात आहे. आज शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी विविध क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध केली असून आता पेट्रोल पंपावरही महिलां मोठ्या संख्येने रोजगार करीत असल्याचे चित्र सोलापुरात दिसत आहे. आजपर्यंत पेट्रोल पंपावर नोकरी करणारे पुरुषच प्रामुख्याने होते.परंतु बदलत्या काळात कुटुंबाची जबाबदारी महिलांवर जशी पडत चाललीय तशी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात महिलांही निर्भयपणे व आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहेत.
पेट्रोल पंपावर इंधन भरणे, ग्राहकांशी संवाद साधणे, आर्थिक व्यवहार हाताळणे अशा जबाबदाऱ्या सोलापुरात महिलां सक्षमपणे पार पाडत आहेत. अनेक ठिकाणी महिला कर्मचारी पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकाला शिस्तबद्ध सेवा आणि प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. त्यामुळे त्या ग्राहकांचा विश्वास जिंकताना दिसतायत.
या कामामध्ये उन्हाळा, पावसाळा, रात्रपाळी यांसारखी आव्हाने असली तरी महिलांनी या सर्व अडचणींवर मात केली आहे. कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यासोबतच स्वावलंबी होण्याचा त्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत सपोर्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कदम यांनी व्यक्त केले आहे.
सपोर्ट फाउंडेशन आणि सी वाए डी ए पुणे या समविचारी सामाजिक संस्थानी महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक महिला या क्षेत्रात येण्यास इच्छा व्यक्त करीत आहेत.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलांची ही वाढती संख्या समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक असून, महिला सक्षमीकरणाचा हा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. पेट्रोल पंपावर व अन्य ठिकाणी काम करू इच्छिणाऱ्या गरजू व अर्धशिक्षित महिलांनी रेश्मा कदम यांच्या शी 8007409123 या नंबरवर संपर्क करावा.


























