सोलापूर – पुणे विभागाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर शालेय शहर स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शहर शालेय क्रीडा स्पर्धांच्या सहविचार सभेत शहरातील क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी हायस्कूल व नाईट कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस शहरातील विविध शाळांतील २०० क्रीडा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलाने झाली. व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुजाता जुजगार, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, टेक्निकल इन्चार्ज इलियास पठाण, विभागीय शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, शारीरिक शिक्षण जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष खेंडे, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार आणि महासंघ शहराध्यक्ष सुहास छंचुरे आदी उपस्थित होते. या बैठकीत क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या विविध अडीअडचणींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती घोडके यांनी केले.
——-
सोलापूरला यंदा २५ विभागीय व ५ राज्य स्पर्धांचे आयोजन
यंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या नोंदणीसाठी संपूर्ण राज्यासाठी एकच अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्रीडा शिक्षकांनी त्याचे ‘प्रायमरी फॉर्म’ भरावयाचे आहेत. नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच सोलापूर शहरातील क्रीडा शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली जाईल. यंदा सोलापुरात २५ विभागीय क्रीडा स्पर्धा आणि ५ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
——




















