सोलापूर – वडिलांच्या निधनानंतर घरची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असताना नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या शुभम दयानंद लोंढे यांना अखेर अनुकंपा नियुक्तीचा आधार मिळाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ऑनलाइन प्राप्त प्रस्तावाला तातडीने मंजुरी देत शुभम यांची प्रयोगशाळा परिचर म्हणून पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती मंजूर केली. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळताच शुभम भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत बुधवारी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत माध्यमिक शिक्षण विभागात आले होते. यावेळी वैयक्तिक मान्यता, पदोन्नती, अनुकंपा नियुक्ती आणि पोर्टल भरतीसह विविध विषयांवर चर्चा झाली. अनुकंपा नियुक्तीच्या प्रलंबित प्रस्तावांचा विषय चर्चेला आल्यानंतर शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शुभम लोंढे यांच्या ऑनलाइन प्रस्तावाची तत्काळ दखल घेत मंजुरी दिली.
मजरेवाडी येथील पंचशील माध्यमिक प्रशालेत प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले दयानंद लोंढे यांचे २५ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यातच शुभम यांच्या आईला कर्करोगाची बाधा झाल्याने वडिलांच्या निधनानंतर मिळालेली आर्थिक लाभाची रक्कम त्यांच्या उपचारासाठी खर्च झाली. रुग्णालयाचा वाढता खर्च आणि घरात नियमित उत्पन्नाचे साधन नसल्याने कुटुंबाची आर्थिक कोंडी झाली.
या कठीण काळात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात कार्यरत असलेले त्यांचे मामा लोखंडे यांनी शुभम यांना आधार दिला. वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी शुभम यांनी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाकडे अर्ज केला. लिपिक अनिल पाटील यांनी कागदपत्रांची पूर्तता तपासून प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षणाधिकारी जगताप यांच्याकडे सादर केला. ऑनलाइन प्रक्रियेतून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात आले.
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याच्या संघर्षात असलेल्या शुभम यांच्यासाठी ही नियुक्ती केवळ नोकरी नसून कुटुंबाला मिळालेला आर्थिक आधार ठरली. नियुक्तीपत्र स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत भावनांचे अश्रू होते. सावंत आणि जगताप यांनी शुभम यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
चौकट
अनुकंपा प्रस्तावांना गती
माध्यमिक शिक्षण विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना दिलासा मिळत आहे. विभागाच्या या कार्यपद्धतीबद्दल शिक्षक व कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शिक्षक संघटनेचे वांगीकर आदी उपस्थित होते.





















