वैराग – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकता महिला मंच, शेळगाव (आर) यांच्या वतीने मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महामानवाच्या विचारांचा संकल्प
कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आचरणात आणण्याचा संकल्प यावेळी उपस्थित महिलांनी केला. एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शेळगाव (आर) मध्ये पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षकांकडून कौतुकाची थाप
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्रांती केली. ‘हिंदू कोड बिल’ मांडून त्यांनी महिलांना वारसाहक्क, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचे कायदेशीर अधिकार मिळवून दिले. आज ग्रामीण भागातील महिला मोठ्या धैर्याने घराबाहेर पडून अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत, हे केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच शक्य झाले आहे. संविधानाने आपल्याला समानतेचा अधिकार दिला असून, महिलांनी या अधिकारांचा वापर करून स्वतःची प्रगती साधावी.”
“एकता महिला मंचाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व समाजातील महिलांना एकत्र आणून महापुरुषांची जयंती साजरी करणे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. समाजहितासाठी आणि महिलांच्या प्रगतीसाठी राबवले जाणारे हे उपक्रम स्तुत्य असून अशा कार्याला पोलीस प्रशासनाचे सदैव सहकार्य राहील.”
खेळ आणि स्पर्धांचा जल्लोष
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावेळी लिंबू-चमचा, प्रश्नमंजुषा आणि लकी ड्रॉ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मालबार गोल्ड अँड डायमंड्स यांचे या स्पर्धांसाठी विशेष सहकार्य लाभले. विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
मालबार गोल्ड लकी ड्रॉ स्पर्धा: १. रंजना गवळी (प्रथम), २. अविदा गायकवाड (द्वितीय), ३. वैशाली शिंदे (तृतीय).
प्रश्नमंजुषा स्पर्धा: १. सविता काटे (प्रथम), २. रंजना गवळी (द्वितीय), ३. रेश्मा वानखरे (तृतीय).
लिंबू-चमचा स्पर्धा: १. राजश्री बादगुडे (प्रथम), २. सोनाली गायकवाड (द्वितीय), ३. राणी गवळी (तृतीय), ४. अश्विनी काशीद (उत्तेजनार्थ).
सहकार्य आणि उपस्थिती
कार्यक्रमासाठी पंचशीला बनसोडे यांनी स्वखर्चातून सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली होती. त्यांना पूजा बादगुडे आणि दिपाली व्यवहारे यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी वैशाली नावगुडे, शाहीर सय्यद (मालबार गोल्ड), सुमित नवले, अनुराधा हडपद, पोलीस कॉन्स्टेबल किसन कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच एकता महिला मंचाच्या गीतांजली जोशी, लक्ष्मी सुतार, आशा विभुते, सविता काटे, पंचशीला बनसोडे,रत्नप्रभा गायकवाड, सारिका जाधव, रंजना गवळी, राणी गवळी, गंगा गोडगे, मनीषा गवळी, सोनाली गायकवाड, राजश्री बादगुडे, संगीता कदम, पूजा कुशवाह, सुरेखा कोळी,मंजुळा गवळी,जयश्री गवळी, वैशाली साळूंखे, लक्ष्मी मोरे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता काटे यांनी केले, प्रास्ताविक वैशाली नावगुडे यांनी मांडले, तर गीतांजली जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी झालेली ही जयंती संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.




















