सोलापूर : महापालिकेच्या पाच महत्त्वाच्या फाईली जाणीवपूर्वक गहाळ करून महापालिकेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या बहुचर्चित खटल्यातून तत्कालीन नगरअभियंता सुभाष बळीराम सावस्कर यांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सावस्कर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. २००९ ते २०१३ या कालावधीत नगरअभियंता म्हणून कार्यरत असताना सावस्कर आणि भूमी-मालमत्ता विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पाच महत्त्वाच्या फाईली गहाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून डिसेंबर २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.
सावस्कर यांनी ॲड. शशी कुलकर्णी यांच्यामार्फत दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला.
गहाळ फाईल्सचा ताबा नगरअभियंत्याकडे नसतो, तपासात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही तसेच खटला दाखल करण्यासाठी आवश्यक कायदेशीर मंजुरी घेण्यात आलेली नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर सावस्कर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. गावडे यांनी उपलब्ध कागदपत्रे, पुराव्यांचा अभाव आणि कायदेशीर मंजुरी नसल्याचा विचार करून हा खटला पुढे चालविणे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे नमूद करत सावस्कर यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात सावस्कर यांच्या वतीने ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड. प्रसाद अग्निहोत्री व ॲड. आदित्य अदोने यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲड. पी. एस. जन्नू यांनी बाजू मांडली.
Post Views: 6