टेंभुर्णी : उजनी धरणातील पाणीसाठा पुन्हा एकदा कमाल पातळीच्या जवळ पोहोचला असून, शुक्रवार (दि. ७ ऑगस्ट २०२६) सायंकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९९.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी ४९६.८२० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणात ३३१६.६६ दशलक्ष घनमीटर (११७.११ टीएमसी) इतका एकूण पाणीसाठा आहे. त्यापैकी १५१३.८५ दशलक्ष घनमीटर (५३.४६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
सध्या उजनी धरणाच्या सांडव्यातून ४० हजार क्युसेक्स, तर वीजगृहातून १,६०० क्युसेक्स असा एकूण ४१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीची पाणीपातळी कायम उंचावलेली असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
धरणात दौंड नदी मापन केंद्रातून २५,७२६ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. आवक आणि विसर्ग यामध्ये संतुलन राखत जलसंपदा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पावसाचा जोर आणि पाणलोट क्षेत्रातील परिस्थितीनुसार विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याशिवाय धरणातून मुख्य कालव्यात २,५५० क्युसेक्स, टनलद्वारे ९०० क्युसेक्स, सीना-माढा उपसा सिंचन योजनेत २१० क्युसेक्स आणि दहीगाव उपसा सिंचन योजनेत ९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. रिव्हर स्लुईसमधून सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
उजनी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले असल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळावे, जनावरे व शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच लहान मुलांना नदीकाठी जाऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जलसंपदा विभाग, भीमा खोरे पूर नियंत्रण कक्ष आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, पावसाची तीव्रता आणि धरणातील आवक लक्षात घेऊन पुढील विसर्गाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 4