बार्शी – ग्रामीण विकासाच्या दिशेने बार्शी तालुका वेगाने प्रगती करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आलेल्या विकासकामांचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून आलेल्या तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन परीक्षण केले.
गावागावांत राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान, सौरऊर्जा प्रकल्प, शैक्षणिक सुविधा, महिला बचत गटांचे उद्योग, उपजीविका विकास तसेच लोकसहभागातून साकारलेले विविध उपक्रम यांची समितीने सखोल माहिती घेतली. ग्रामपंचायतींच्या कामकाजातील पारदर्शकता, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग याबाबत समितीने समाधान व्यक्त केले.
कंधारचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बार्शी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकास कामांचा आढावा घेतला. या समितीत विस्तार अधिकारी कृषी गणेश कोकणे, विस्तार अधिकारी पंचायत प्रकाश मुसळे, विस्तार अधिकारी सांख्यिकी अमित शिंदे, वरिष्ठ सहाय्यक किरण पांडागळे, ग्रामपंचायत अधिकारी मोहन अकेमवार तसेच पत्रकार मारोती चिलपिपरे यांचा समावेश होता.
उपळाई (ठोंगे) ग्रामपंचायतीमध्ये समितीचे स्वागत उपसरपंच विजय ठोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयवंत कदम, ताई भोसले, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय दराडे, मुख्याध्यापक पांडुरंग कांबळे, अनिल काळे, डॉ. किरण कदम, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, महिला बचतगट, शेतकरी गट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या ६ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार राज्यभर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येत असून, ग्रामपंचायतींनी गावपातळीवर केलेल्या विकास कामांचे मूल्यमापन तज्ज्ञ समित्यांमार्फत करण्यात येत आहे.
या अंतर्गत शासकीय कार्यालयांचे सौरऊर्जेमध्ये रुपांतर, ग्रामपंचायत कार्यालयांचे सुशोभीकरण, डिजीटल दप्तर व्यवस्थापन, शाळांतील शैक्षणिक सुविधा, परसबाग, सार्वजनिक स्मशानभूमीतील पाणीपुरवठा, सौरदिवे, स्वच्छता मोहीम, महिला बचतगटांचे उद्योग, शेतकरी उत्पादक कंपन्या, वृक्षारोपण तसेच स्थानिक तीर्थक्षेत्र विकास यासारख्या विविध उपक्रमांची समितीने पाहणी केली.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे गावात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती समितीसमोर मांडली. यावेळी पंचायत विस्तार अधिकारी नवनाथ पांडव, विस्तार अधिकारी प्रदीप कुलकर्णी, ग्रामपंचायत अधिकारी दर्शन मंडलिक, दत्ता मोरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, ३ मे ते १५ मे या कालावधीत बार्शी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या विकास कामांचे प्रत्यक्ष मूल्यमापन करण्यात येत असून, या अभियानामुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा आणि गती मिळाल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

























