पंढरपूर – आषाढी यात्रेच्या काळात प्रशासनातील समन्वय आणि सातत्यपूर्ण संवाद महत्त्वाचा असून, त्यासाठी अत्याधुनिक पीपीडीआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या बरोबरच शहरातील अतिक्रमण हटविण्यात आले असून, चंद्रभागेच्या वाळवंटाची स्वच्छता कायम राहावी यासाठी मी स्वतः लक्ष देत असून संपुर्ण यात्रेच्या कालावधीत आपण पंढरपूर मुक्कामी राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी सांगितले.
आषाढी यात्रेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पंढरपुरात आलेल्या जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मंगळवारी (दि.१४) पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत यात्रेशी संबंधित असलेल्या विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, “प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांची यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मागील यात्रा काळात ज्या ठिकाणी नियोजन कमी पडले होते, त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत.”
यावेळी उपस्थित पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या महापूजे दरम्यान होणारी व्हीआयपी व त्यांच्या वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष दक्षता घेणे, शहरातील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर व विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे, तसेच काही रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने यात्रेपूर्वीच रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या बाबींसह विविध सूचना मांडल्या. या सर्व सूचनांची दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
———————
चौकट : ( कमीत कमी वेळात दर्शन घडविण्यासाठी प्रयत्न )
आषाढी यात्रा काळात येणाऱ्या लाखो भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, यासाठी दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्याबाबत पोलिसांसह मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिऱ्यांनी दिली. तसेच आषाढी यात्रा संपेपर्यंत पंढरपूर परिसरात मुक्काम करणार असून, यात्रेच्या नियोजनात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
———————–
चौकट : ( ‘फेस आयडेंटिफिकेशन’चा वापर )
पंढरपूर शहरातील सर्व ३०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामध्ये चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (फेस आयडेंटिफिकेशन) वापरण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीतून गुन्हेगारांना अचूकपणे शोधणे शक्य होणार आहे. शहरातील अतिक्रमण हटविण्यात आले असून, चंद्रभागेच्या वाळवंटाची स्वच्छता कायम राहावी यासाठी मी स्वतः लक्ष देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
——————
चौकट : ( जादा भाडे आकारल्यास रिक्षाचालकाचा परवाना रद्द )
यात्रा काळात बसस्थानक दूर असल्याने काही रिक्षाचालकांकडून भाविकांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रिक्षाचालक संघटनांना सक्त ताकीद देण्यात आली असून, भाविकांकडून एक रुपयाही जास्त भाडे आकारल्यास संबंधित रिक्षाचालकाचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
——————
चौकट : ( डॉक्टरांनी पंढरपुरातच थांबावे )
पंढरपूरातील डॉक्टर यात्रा काळात परगावी जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनशी चर्चा करण्यात आली असून, डॉक्टरांनी पंढरपुरात राहून भाविकांना सेवा द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Post Views: 5