पंढरपूर – येथील मंदिर परिसरात काँरिडाँर करताना संभाव्य बाधितांना विश्वासात घेऊनच तो प्रत्यक्षात अंमलात आणला जाणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र बाधितांना विश्वासात न घेताच काँरिडाँर राबविण्याचा घाट घातला जातो आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केल्याची भावना बाधित कुटुंबामध्ये निर्माण झाली असून आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दशमी दिवशी ज्या वेळी मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापुजेसाठी पंढरपूरात दाखल होतात त्या वेळेपासून अर्थात २४ जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजल्या पासून ते मुख्यमंत्री आषाढी एकादशीची (२५ जुलै ) महापुजा करुन परत मुंबईकडे प्रयाण करेपर्यंत मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविण्याचा निर्धार केला आहे. या बरोबरच मुख्यमंत्र्याचे स्वागत देखील काळे झेंडे दाखवूनच येथील व्यापारी करणार असल्याची माहिती संभाव्य बाधितांचे नेते बाबाराव महाजन बडवे यांनी जाहीर केले आहे.

श्री विठ्ठल मंदिराजवळ बाधित कुटुंबांची बुधवारी (दि.१५ जुलै) बैठक पार पडली. या बैठकीला बाधित व्यापारी व बाधित कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँरिडाँर आराखडा करताना विश्वासात घेण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही अशी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान काँरिडाँर मध्ये सहाशे ते सातशेहून अधिक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार आहे. घरे आणि व्यापारी दुकाने बाधित होणार असल्याने अनेकांनी संतापाची भावना व्यक्त केली. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. सुमारे तीस लाख वारकरी भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.
एकादशीच्या पूर्वसंध्येला अर्थात दशमीच्या दिवशी म्हणजे २४ जुलै रोजी रात्री आठ ते एकादशीच्या दिवशी (२५ जुलै) मुख्यमंत्री पंढरपूरात मुंबईला परत जाई पर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय बाधित व्यापाऱ्यांनी घेतला आहे. सुमारे १२ ते १५ तासांहून अधिक वेळ प्रासादिक व अन्य वस्तुंची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत असताना आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी श्री विठ्ठल मंदिरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करणार असल्याचे देखील बाबाराव महाजन बडवे यांनी स्पष्ट केले.
———————-
चौकट : ( प्रशासनाची कसोटी )
बाधित मंडळींनी यात्रेच्या तोंडावरच प्रशासनाची चांगलीच गोची केलेली आहे. त्यामुळे यात्रेच्या पूर्वी जिल्हा प्रशासनाकडून मंदिर परिसरातील संभाव्य बाधित मंडळींशी कशा प्रकारे संपर्क साधला जातो आहे तसेच या बाधित मंडळींना आंदोलनापासून कसे रोखले जाते याकडे तमाम पंढरपूर शहरवासियांचे आता लक्ष लागले आहे.
Post Views: 6