धाराशिव : व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत नामांकित आयसीआयसीआय बँकेत निवड मिळवली आहे. महाविद्यालयात आयसीआयसीआय बँकेचा कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, आयसीआयसीआय बँकेचा २०२६ सालातील हा पहिलाच कॅम्पस प्लेसमेंट उपक्रम ठरला.
या प्लेसमेंट प्रक्रियेत महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेत सहभाग नोंदवला होता. त्यामधून वैष्णवी रमेश वाघ, अभिनव अंगद काळे, प्रतीक बालाजी नाईकनवरे, तन्वी सुनील देशमुख, दीप्ती संजय जाधव आणि अजय विजय घेवारे या सहा विद्यार्थ्यांची अंतिम मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. अंतिम मुलाखतीनंतर वैष्णवी रमेश वाघ आणि अभिनव अंगद काळे या विद्यार्थ्यांची रिलेशनशिप मॅनेजर – फार्मर फायनान्स या पदासाठी अंतिम निवड करण्यात आली.
आयसीआयसीआय बँकेच्या शेतकरी वित्त (Farmer Finance) विभागामध्ये निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना कृषी कर्ज, अवजारे कर्ज, सोनेतारण कर्ज तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध वित्तीय योजनांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाने सातत्यपूर्ण प्रयत्न करत आयसीआयसीआय बँकेला कॅम्पस मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते.
या मुलाखती आयसीआयसीआय बँकेच्या शेतकरी वित्त विभागाचे एचआर व्यवस्थापक श्री. सुनील डोलास, रिजनल हेड श्री. प्रतीक श्रीयान तसेच एचआर व्यवस्थापक श्रीमती अवनेशा दास यांनी घेतल्या. विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य, कृषीविषयक ज्ञान आणि व्यवस्थापन क्षमतेची तपासणी करून अंतिम निवड जाहीर करण्यात आली.
कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील आणि करण प्रतापसिंह पाटील यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यापुढेही कृषी क्षेत्रातील नामांकित बँका, कंपन्या आणि कृषीआधारित उद्योगांना महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटसाठी आमंत्रित करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
हा कॅम्पस प्लेसमेंट उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शेख मोहसीन, प्रा. सुमिथा पाटील, डॉ. गांधले अमित, प्रा. मुंडे नवनाथ, डॉ. इंगळे रोहित, डॉ. खोसे प्रताप, प्रा. दळवे सतेश, प्रा. डोके आकाश, प्रा. माळी प्रवीण, प्रा. शेटे देवानंद, प्रा. भालेकर सुनील, प्रा. शिंदे अक्षय, प्रा. गोटे प्रिया, प्रा. मगर प्रगती, प्रा. नागरगोजे विजय, श्री. सुतार रामचंद्र, श्री. मुजावर गुलाब आणि श्री. गिरी ओंकार यांनी मोलाचे सहकार्य केले.
























