अक्कलकोट – शहराच्या विकासाला चालना देणारे विविध महत्त्वपूर्ण निर्णय अक्कलकोट नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आले. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पंडित दीनदयाल सभागृहात झालेल्या या सभेत एकूण २८ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
बसस्थानक परिसरातील आयलंडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावास सभेने मंजुरी दिली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडोर मंजूर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. शहर विकास आराखड्यातील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरालगतची जागा मंदिर विकासासाठी आरक्षित करण्याबाबत त्रिसदस्यीय समितीने घेतलेल्या निर्णयासही मंजुरी देण्यात आली.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, विविध विकासकामे,
वार्षिक निविदा आणि प्रलंबित देयकांसह नळजोडणी
कायमस्वरूपी खंडित करण्याच्या अर्जावर निर्णय घेण्यात आला.
लिंगायत स्मशानभूमी विस्तार आरक्षणातील फेरबदल, प्रियदर्शनी मंगल कार्यालयाचा फेरजाहीर लिलाव, व्यापारी संकुलातील गाळेधारकांना मुदतवाढ तसेच विविध विकासकामांच्या मुदतवाढीसही सभेने हिरवा कंदील दिला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प,
ओला-सुका कचरा प्रक्रिया आणि वैज्ञानिक भूगर्भाशी
संबंधित स्थापत्य कामांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची दुरुस्ती, वृक्षसंवर्धन समितीची स्थापना आणि वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या दत्तक व्यवस्थापनाचा निर्णयही घेण्यात आला.भटक्या श्वानांबाबत न्यायालयीन निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही
करण्यासही मान्यता देण्यात आली.
या सभेस मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष ऋतुराज ऊर्फ बंटी राठोड, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक तसेच नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शैलेश बिराजदार यांनी विषयांचे वाचन केले. शहर विकासाशी संबंधित सर्व २८ विषय एकमताने मंजूर झाल्याने आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळण्याची
अपेक्षा व्यक्त होत आहे.
** महिला, बालकल्याण व दिव्यांगांसाठी निधी
सन २०२६-२७ साठी महिला व बालकल्याण तसेच दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के निधी खर्च करण्यास सभेने मंजुरी दिली.नगरपरिषदेतील कर्मचारी दिवंगत महेश पवार यांच्या पत्नी उज्वला पवार यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.
Post Views: 13