मंगळवेढा – येथिल नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक कार्यक्रम तसेच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवेढा शहरात सांस्कृतिक भवनाची नितांत गरज आहे. मात्र, निधीअभावी या भवनाचे काम रखडल्याने नागरिक, विद्यार्थी, कलावंत आणि सामाजिक संस्थांना कार्यक्रमांसाठी योग्य व परवडणारी जागा उपलब्ध होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक भवन उभारणीसाठी तत्कालीन शासनाने मोठ्या निधीची मंजुरी दिल्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली. सध्या इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी अंतिम टप्प्यातील अंतर्गत कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून कामाला गती द्यावी, अशी मागणी मंगळवेढेकरांनी केली आहे.
बांधकाम अवस्थेत असलेल्या नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी मंगळवेढ्यातील विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक संस्था, कलावंत आणि पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबईच्या संचालिका तेजस्विनी कदम, कार्यवाह यतीराज वाकळे, नगरसेविका सीमा बुरजे, मसाप अध्यक्ष प्रकाश जडे, सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू, यांच्यासह रमेश जोशी, नारायण गोवे, राजेंद्र चेळेकर, मारुती वाकडे, दत्तात्रय हजारे, लहू ढगे, प्रा. सचिन इंगळे, चंद्रकांत पवार उपस्थित होते.
“निधी मंजूर करा, काम पूर्ण करा आणि सांस्कृतिक भवन जनतेसाठी खुले करा,” अशी ठाम मागणी उपस्थितांनी केली. यावर्षीअखेरपर्यंत काम पूर्ण करून सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र पाठपुरावा करण्यात येईल, असा इशारा उपस्थितांनी दिला.
Post Views: 9