बार्शी – ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच हिंदू संस्कृतीतील सुवासिनींसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा वटपौर्णिमा सण सोमवार दि. २९ जून रोजी बार्शी शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्य लाभावे या भावनेने सुवासिनींनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करुन सात जन्मांच्या सहजीवनाची प्रार्थना केली.
सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषा आणि सोळा शृंगार केलेल्या सुवासिनी पूजेचे ताट, हळदी-कुंकू, फुले, दोरा, दिवा, फळे व इतर पूजा साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ दाखल झाल्या. वडाच्या झाडाला जल अर्पण करुन हळदी-कुंकू वाहण्यात आले. त्यानंतर वटवृक्षाभोवती पवित्र दोरा गुंडाळून सात प्रदक्षिणा घालण्यात आल्या आणि पतीच्या दीर्घायुष्याची मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
हिंदू धर्मात वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र स्थान आहे. वडाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि शेंड्यावर भगवान शंकर यांचा वास असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी, सौख्य आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौराणिक कथेनुसार, सावित्रीने वडाच्या झाडाखाली मरण पावलेल्या आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवण्यासाठी वटवृक्षाखाली तपश्चर्या केली होती. तिच्या दृढ निश्चय, पतिनिष्ठा आणि बुद्धिमत्तेमुळे यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सत्यवानाला पुनर्जीवन दिले. याच स्मृतीप्रित्यर्थ वटपौर्णिमेचा सण पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी साजरा केला जातो.
बार्शी शहरातील विविध भागांसह तालुक्यातील गावोगावी वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी सामूहिक वडपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. पूजा संपल्यानंतर सुवासिनींनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाण देत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्सवी वातावरणाने भारावून गेला.
Post Views: 13