सोलापूर : जिल्ह्यात गोवंशातील जवळपास सात लाख पशूना लंपीची लस देण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण झाल्यामुळे या साथीच्या रोगाची तीव्रता कमी झाली आहे. सर्वात जास्त लसीकरण हे सांगोला तालुक्यात करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात लंपीच्या साथीने जनावरांचा बळी घेतला आहे. या साथीमुळे दूध उत्पादनही घटले आहे.
राज्य सरकारने गोवंशातील लंपी या जीवघेण्या चर्म आजाराच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात जवळपास सात लाख गाई बैल व वासरांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात विशेषतः सांगोला, माळशिरस, माढा पंढरपूर या तालुक्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला होता. संकरित गाई या रोगाला सर्वात जलद गतीने बळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले व गोठ्यातील किमती गाई दगावल्या. खिलार जनावरांमध्येही लंपी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे राज्य सरकारने गेल्या वर्षभरापासून यासाथीच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचा कार्यक्रम आखला होता. सरकारने राबवलेल्या लसीकरण मोहिमेमुळे या रोगाला नियंत्रित करण्यात यश आल्याचे दिसून येत आहे.
….
जिल्ह्याला मिळालेली लसीची मात्रा : ७ लाख १ हजार ५०० डोस
लसीकरण झालेल्या जनावरांची संख्या : ६ लाख ९८ हजार ५००
……
लसीकरण केल्यामुळे लंपी या साथीच्या आजारावर
सद्य:स्थितीला जिल्ह्यात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या रोगाने प्रादुर्भाव असलेल्या जनावरांची संख्या अल्प आहे. साथ नियंत्रणात आल्यामुळे नुकसानीची तीव्रता कमी झाली आहे.
– विशाल येवले, उपायुक्त, पशूसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर
…

















