सांगोला – सांगोला तालुक्यासाठी रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडावे तसेच सोनके व चिंचोली तलाव भरून द्यावेत, अशी मागणी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत त्यांनी १० नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणी वितरण करताना कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. नियोजनानुसार शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नीरा उजवा कालव्याच्या पाणी नियोजनासंदर्भात ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीत आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी खरीप हंगामातील ढिसाळ पाणी नियोजनावरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुष्काळी सांगोला तालुक्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून, पाणी नियोजनातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भयाण दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडण्याच्या आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
चौकट-
टेंभू-म्हैसाळ योजनेचे आवर्तन १५ डिसेंबर पर्यंत सोडणार
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभू-म्हैसाळ योजनेचे आवर्तन १५ डिसेंबर पर्यंत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. नीरा उजवा कालव्याच्या पाण्याबरोबरच टेंभू-म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठीही आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Post Views: 15