सोलापूर : एमआयडीसी परिसरातील आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे आधुनिकीकरण करून मनुष्यबळ, अग्निशमन वाहने आणि आवश्यक सुविधा वाढवाव्यात. शहरात किमान दहा स्वतंत्र व सुसज्ज फायर स्टेशन तातडीने सुरू करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली, स्थापत्य समितीचे सभापती विजय चिप्पा आणि नगरसेवक सिद्धेश्वर कमटम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपायुक्त गिरीश पंडित यांना निवेदन दिले.
सोलापूर शहराचा विस्तार, तीन एमआयडीसी क्षेत्रे आणि औद्योगिक आस्थापनांमधील ज्वलनशील पदार्थांचा वापर लक्षात घेता सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. सध्या विभागात आवश्यक असलेल्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांऐवजी केवळ ४५ कर्मचारी कार्यरत आहेत. विभागाकडील सहा अग्निशमन वाहनांपैकी काही वाहने १५ वर्षे जुनी असून, त्यांच्याऐवजी नवीन वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरात किमान १० स्वतंत्र फायर स्टेशन उभारावीत, एमआयडीसीतील अपूर्ण अग्निशमन केंद्राचे काम तातडीने पूर्ण करावे, २५ ऑक्सिजन युनिट उपलब्ध करून द्यावीत, तसेच फोम साठवणूक, पाणीपुरवठा आणि पंपिंग हाऊसची व्यवस्था करावी. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांचे नियमित फायर ऑडिट, टोल-फ्री हेल्पलाइन सक्षम करणे आणि अग्निशमन विभागाच्या प्रलंबित मागण्यांना जिल्हा नियोजन व विकास समितीकडून (डीपीडीसी) मंजुरी मिळविण्याची मागणीही करण्यात आली.
विभागाकडे सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी असल्याचे सांगितले जात असतानाही आवश्यक सुविधांचा अभाव असल्याकडे प्रशांत पल्ली यांनी लक्ष वेधले. अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोष देण्याऐवजी त्यांना पुरेशी साधनसामग्री आणि मनुष्यबळ देऊन अग्निशमन यंत्रणा सक्षम करावी, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली.
Post Views: 8