
सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्र. १, सोलापूरच्या वतीने सभासदांना तब्बल ९० लाख रुपयांचा लाभांश वितरित करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. ही सभा शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी यांनी दिली.
सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक व सामाजिक कार्याचा आढावा सादर केला. संस्थेचे भागभांडवल २० कोटी रुपये असून बचत ठेवी ५ कोटी २९ लाख रुपये आहेत. राखीव व इतर निधी मिळून संस्थेकडे ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. संस्थेची गुंतवणूक १ कोटी ४८ लाख रुपये असून कर्जवाटप व वसुलीचा व्यवहार २८ कोटी ५२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
संस्थेने सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच सीएसआर निधीतून जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘अक्षय पात्रा’ संस्थेला १ लाख ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. सभासदांना यंदा ३.७५ टक्के लाभांश आणि बचत ठेवींवर ८ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव असून, सुमारे ९० लाख रुपयांची रक्कम सभा मंजूर झाल्यानंतर थेट सभासदांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
संस्थेचे सुसज्ज कार्यालय असून कर्जावरील व्याजदर केवळ ६ टक्के आहे. एसएमएस अलर्ट, एनईएफटीसारख्या आधुनिक बँकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय रक्तदान शिबिरे, सामाजिक जनजागृती उपक्रम, दिनदर्शिका व वार्षिक अहवालातून समाजोपयोगी संदेश देण्याचे कार्य संस्थेमार्फत नियमितपणे केले जाते. टर्म विमा योजनेअंतर्गत निधन झालेल्या सभासदांच्या वारसांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळ, पदाधिकारी आणि सभासदांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष श्रीधर कलशेट्टी तसेच संचालक डॉ. एस. पी. माने, व्ही. व्ही. पाटील, एम. आर. तांबोळी, व्ही. एम. घेरडे, व्ही. व्ही. घोगरे, जी. एम. भारडकर, एस. डी. हिमाणे, टी. ए. मुतवल्ली, एस. एच. राठोड, सी. ए. वाघमारे, एम. एस. शिंदे, किरण लालबोंद्रे, विकास शिंदे, रोहित घुले, डॉ. पांडुरंग नवले तसेच तज्ज्ञ संचालक कुंडलिक खुदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत आहे.
Post Views: 4