सोलापूर – लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि बहुजन समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. मराठी साहित्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे त्यामुळे केंद्र शासनाने तात्काळ अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावा अशी मागणी भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि अल्प औपचारिक शिक्षण असूनही अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यात अमूल्य भर घातली. “फकिरा” सारख्या कालजयी कादंबरीसह अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांद्वारे त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या साहित्याने सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीचा संदेश दिला.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अद्वितीय साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा तसेच
“मराठी राज्यभाषा दिन” नावाचा स्वतंत्र अधिकृत दिवस महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला नाही. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी “मराठी राज्यभाषा दिन” घोषित करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शत्रुगुण माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलदास, शिरीष जगदाळे, इर्षद नागोरे, प्रकाश डोंगरे, सतीश वावरे आदी उपस्थित होते.


















