सोलापूर : महापालिका क्षेत्रातील थकीत भाडे वसुलीसह थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाईचे स्पष्ट आदेश असतानाही रोजच्या उद्दिष्टानुसार पाच गाळे सील न करणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कारवाई केली आहे. महापालिकेच्या तीन पथकांतील संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील थकीत भाडे वसूल करणे आणि थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही, दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रोज ५ गाळे सील न केल्याने महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. कर्तव्यात कसूर करून महापालिकेच्या महसूल वाढीस बाधा निर्माण केल्याप्रकरणी लँड फी पथक,मेजर गाळे पथक आणि मिनी गाळे पथक या तीन पथकांतील एकूण १४ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांच्या कामा संदर्भातील अहवाल दिला होता.
अभय योजनेअंतर्गत गाळेधारकांची दंडाची रक्कम १०० टक्के माफ करून थकीत भाडे वसूल करण्याचे व जे गाळेधारक भाडे भरणार नाहीत, त्यांचे गाळे उतरत्या क्रमाने रोज ५ याप्रमाणे सील करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, १८ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या ५ गाळे सील करण्याचे उद्दिष्ट १९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही.
यावरून कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चा भंग केल्याचे सिद्ध झाल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडाची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट २०२६ (पेड इन सप्टेंबर २०२६) च्या वेतनातून वसूल केली जाणार आहे.
——
Post Views: 4