पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील कथित वृक्षलागवड घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. या संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचने तसे आदेश दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेत वृक्षलागवड न करता सुमारे १०९ कोटी रुपयांचा गैरप्रकार केल्याची तक्रार करून याची चौकशी करावी, अशी तक्रार दादासाहेब चव्हाण यांनी पंढरपूर येथील न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ४ ऑगस्ट २०२२ रोजी सामाजिक वनीकरण विभागातील ८ अधिकाऱ्यांविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, शहर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी ठोस तपास न करता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती पाहता या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी याचिका चव्हाण यांनी चार महिन्यांपूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचकडे केली होती. यावर २४ जून रोजी अंतिम सुनावणी होऊन हा गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी द्यावा, असा निकाल न्यायमूर्ती संदेश पाटील व वृषाली जोशी यांनी दिला आहे.

















