सोलापूर – मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (सर) फेज-३ मोहिमेची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ (बूथ लेवल अधिकारी ) म्हणून कार्यरत शिक्षकांना या कालावधीत कोणतेही अन्य शासकीय अथवा प्रशासकीय काम देऊ नये, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणासाठीही पाठवू नये, असे स्पष्ट आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण हे निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने त्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.
आदेशानुसार, बी. एल.ओ म्हणून नियुक्त शिक्षकांनी मतदार पुनरिक्षणाचे काम नियोजित कालावधीत गुणवत्तापूर्ण व शंभर टक्के पूर्ण करणे अपेक्षित आहे. मोहिमेदरम्यान त्यांच्यावर इतर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात येऊ नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. तसेच, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून, वेळेत व उत्कृष्टरीत्या काम पूर्ण करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येईल.
चौकट
बी.एल. ओ च्या कामात दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशातून देण्यात आला आहे.
कोट
या नव्या निर्णयामुळे मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला अधिक गती मिळण्याबरोबरच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित करण्यास मदत होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.

















