सोलापूर – जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल झाला असून, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांची पदोन्नतीने अहिल्यानगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेचा कार्यभार सोलापूर शहराचे उपनिबंधक उमेश पवार यांच्याकडे प्रभारी जिल्हा उपनिबंधक म्हणून सोपविण्यात आला आहे. नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत पवार हे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची धुरा सांभाळणार आहेत.
किरण गायकवाड यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार सोडत उमेश पवार यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यानिमित्त जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आयोजित निरोप समारंभात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांचा सत्कार करून भावनिक निरोप दिला. त्याचवेळी प्रभारी जिल्हा उपनिबंधक म्हणून उमेश पवार यांचे स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे, उमेश पवार हे बार्शीचे रहिवासी असून नुकतीच त्यांची सहाय्यक निबंधक पदावरून उपनिबंधकपदी पदोन्नती झाली आहे. पदोन्नतीनंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याने सहकार विभागात त्यांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, पतसंस्था तसेच नोंदणीशी संबंधित विविध प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत प्रभारी म्हणून उमेश पवार यांच्याकडे ही जबाबदारी प्रभावीपणे पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे, किरण गायकवाड यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जिल्हा उपनिबंधक पदावर शासन लवकरच कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करणार का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Post Views: 25