सोलापूर – जिल्ह्यातील प्राथमिक शाळांवर वाढत्या वीजबिलांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या ग्रामनिधीतून वीजबिलांची नियमित भरपाई करण्याचा निर्णय प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे शाळांच्या दैनंदिन खर्चाचा प्रश्न सुटून विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना अधिक निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती तसेच आवश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. त्याच धर्तीवर शाळांची वीजबिलेही ग्रामनिधीतून अदा केल्यास शाळांच्या आर्थिक व्यवस्थापनाला मोठा आधार मिळेल, असे संघटनेचे म्हणणे आहे. सध्या अनेक शाळांना वीजबिलासाठी उपलब्ध निधीतील मोठा हिस्सा खर्च करावा लागत असल्याने स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, संगणक, डिजिटल शिक्षण, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर शैक्षणिक सुविधांवर परिणाम होत आहे. वीजबिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींनी स्वीकारल्यास हा निधी थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी वापरता येईल, असा दावा शिक्षक संघटनेने केला आहे.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून, या प्रस्तावाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्याबाबत आश्वासन मिळाल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांना आर्थिक दिलासा मिळण्याबरोबरच शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.