सांगोला – आजचे युग हे विज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञानाचे युग असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ दुसऱ्यांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा स्वतः नवनवीन शोध लावणे ही काळाची गरज बनली आहे. याच प्रगल्भ विचारांची रुजवणूक शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपले संशोधन ‘पेटंट’ करण्याची मोठी संधी ओळखावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे समवेत संशोधन कार्य केलेले डॉ.अशोक नगरकर यांनी केले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला येथील विद्यामंदिर प्रशाला व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संशोधन आणि पेटंट याचे विद्यार्थी दशेतील महत्त्व’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतगुणकी, हाऊ टू स्टडीचे सचिन भालशंकर, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदिप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत रायचुरे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.नगरकर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्यासोबतच्या अनेक प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. स्वतःच्या मुलीचे संशोधन सांगत १० लाख लोकांमागे केवळ ४ शास्त्रज्ञ आहेत तर प्रगत देशांत हे प्रमाण ४०० इतके मोठे आहे. योग्य दिशा मिळाल्यास आपल्याकडील ९५% विद्यार्थी शास्त्रज्ञ होऊ शकतात, असा सार्थ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी या व्याख्यानामागील उदात्त भूमिका स्पष्ट करत, विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची चमक निर्माण व्हावी आणि उत्तम शास्त्रज्ञ घडावेत याच प्रामाणिक हेतूने हे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चारुदत्त जगताप, सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण व उन्मेश आटपाडीकर यांनी केले. आभार प्रशांत रायचुरे यांनी मानले.
चौकट-
काशीनाथ भतगुणकी यांनी सायकलवरून थेट दिल्लीला जाऊन डॉ.कलाम यांना भेटल्याचा स्वतःचा प्रसंग सांगितला. ग्रामीण भागात प्रचंड गुणवत्ता दडलेली असून ३००० पेक्षा अधिक करिअर क्षेत्रे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करावे आणि संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रशालेतील किमान ७५ विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिकारी, शास्त्रज्ञ बनून कृषी व संरक्षण क्षेत्रात आपली स्वप्ने साकार करावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Post Views: 7