सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांसाठी मोठा दिलासा देणारी ‘अभय योजना – २०२६’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकीत भाडे एकरकमी भरल्यास १०० टक्के दंड आणि व्याज माफ करण्यात येणार आहे. ही योजना ६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, सर्व पात्र गाळेधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले आहे.
महापालिकेच्या मालकीचे मेजर व मिनी गाळेधारक, खुली जागाधारक, अधिकृत खोकेदार, बीओटी गाळेधारक, १५६ गाळेधारक तसेच टी.पी. ३/२३ अंतर्गत येणारे सर्व भाडेकरू या योजनेस पात्र आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंतची संपूर्ण थकबाकी तसेच सन २०२६-२७ च्या सहामाहीचे भाडे निर्धारित मुदतीत एकरकमी भरावे लागणार आहे. धनादेशाद्वारे रक्कम भरायची असल्यास तो २८ जुलै २०२६ पूर्वीच्या दिनांकाचा असणे आवश्यक आहे.
महापौर कोंड्याल म्हणाले, महापालिकेने नागरिकांच्या हिताचा विचार करून ही विशेष अभय योजना लागू केली आहे. १०० टक्के दंड व व्याज माफीची ही दुर्मिळ संधी असून पात्र गाळेधारकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तातडीने थकीत रक्कम भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आणि संबंधित समिती अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत असून प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.भाडे तसेच SGST व CGSTची संपूर्ण रक्कम ६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत महापालिकेच्या कार्यालयात भरल्यासच १०० टक्के दंड व व्याज माफीचा लाभ मिळेल. मुदत संपल्यानंतर कोणतीही सवलत मिळणार नसल्याने सर्व संबंधितांनी वेळेत रक्कम भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 9