पंढरपूर – येथील यशवंत विद्यालयात आठवीत शिकणारा अवघ्या १४ वर्षांचा अमेय आशुतोष खंकाळ याने मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आहे. सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले-प्रभुलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्याने काम केलेला ‘कापूसकोंडा’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटात एका कुटुंबाचे आपल्या लाडक्या कुत्र्याशी असलेले नाते आणि प्रेम, सोबत व कौटुंबिक मूल्यांची हळुवार कथा मांडली आहे. जास्वंद एन्टरटेनमेंटचे दिग्दर्शन सचिन मोहिते यांचे असून, निर्माते अनिरुद्ध अंधोरीकर, भूषण पाटील आहेत. भाऊ कदम यांचाही चित्रपटात सहभाग आहे.
—————-
चौकट (कोरोनाकाळात सुरू झाला प्रवास)
अमेयचा अभिनयाचा प्रवास कोरोनाकाळात सुरू झाला. त्या काळात त्याने रील्स बनवायला सुरुवात केली. घरबसल्या सुरू झालेली ही आवड हळूहळू छंदापासून ध्येयापर्यंत पोहोचली. अभिनयाला योग्य दिशा मिळावी म्हणून त्याने मुंबई येथील ‘Miracles Academy Of Arts and Media Pvt. Ltd’ मधून व्यावसायिक अभिनय अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यास, शाळा आणि अभिनय यांचा समतोल साधत त्याने घेतलेली मेहनत आज मोठ्या पडद्यावर दिसत आहे.
अमेयची ही वाटचाल पंढरपूर आणि परिसरातील अनेक बालकलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान शहरातूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि जिद्द व सातत्याच्या जोरावर ती पूर्ण करता येतात, हेच त्याने दाखवून दिले आहे.
——————
चौकट : (आगामी चित्रपट)
‘कापूसकोंडा’च्या यशानंतर अमेय आणखी दोन चित्रपटांमध्ये झळकणार आहे. हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अमेयच्या अभिनयाची पुढची झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आणि पंढरपूरकर उत्सुक आहेत.
——————-
चौकट : (रिल्स पासून सुरू झालेला प्रवास)रील्स बनवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज चित्रपटापर्यंत पोहोचला, याचा आपल्याला खूप आनंद आहे.
“सचिन पिळगावकर सर आणि मधुराणी मॅडम यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाल्याचेही अमोल आवर्जुन सांगतो.
—————–
चौकट : (प्रशिक्षणाचा झाला खूप फायदा)
“शूटिंगदरम्यान सेटवरचे वातावरण खूप प्रेमाचे आणि शिकवणारे होते. कॅमेऱ्यासमोर कसे उभे राहायचे, संवाद कसे म्हणायचे आणि प्रत्येक दृश्यात मन ओतून काम कसे करायचे, हे मला अनुभवी कलाकारांकडे पाहून शिकता आले. अभिनयाच्या प्रशिक्षणाचा मला खूप फायदा झाला. माझे आई-बाबा, माझा भाऊ आयुष, शिक्षक आणि मित्र नेहमी माझ्यासोबत उभे राहिले, त्यामुळेच मी इथवर पोहोचू शकल्याची भावना अमेय आवर्जुन व्यक्त करतो.
—————-
या यशाबद्दल अमेयने आपले आई-वडील, यशवंत विद्यालय (पंढरपूर) चे शिक्षक, अभिनय प्रशिक्षणातील मार्गदर्शक तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. प्रेक्षक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दलही त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
——————-
कोट
प्रेक्षकांनी ‘कापूसकोंडा’ चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावे, हीच अपेक्षा आहे.”
Post Views: 6