पंढरपूर – पंढरपूर शहरातून सुरू असलेली अवजड वाहतूक तातडीने शहराबाहेर वळवावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांकडून होत आहे. मात्र या मागणीकडे प्रशासन आणि शहर वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील तालुका पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाखालील महत्व्च्या रस्त्यावर अवजड वाहतूक करणारा १६ चाकी ट्रक पलटी झाल्याने या प्रश्नाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. विशेष म्हणजे शहरातील महत्त्वाच्या मार्गावर आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून दररोज सुमारे ५० ते ६० हजार भाविक विठ्ठल दर्शनासाठी शहरात येतात. शहरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमणामुळे आधीच वाहतुकीची कोंडी होत असताना त्यात अवजड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक आणखी भर घालत आहे. त्यामुळे नागरिक तसेच भाविकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अवजड वाहतूक शहराबाहेरून वळवावी, यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.
———————
चौकट : ( विधीमंडळात उपस्थित केला होता प्रश्न )
पंढरपूरातील जड वाहतूकी संदर्भात आमदार समाधान आवताडे यांनीही विधीमंडळात प्रश्न विचारुन आवाज उठविल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
———————–
चौकट ( जिवीतहानी नंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का? )
‘एखाद्या अपघातात जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील वाढती वाहतूक, अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन अवजड वाहतूक शहराबाहेर वळवावी अशी मागणी जोर धरीत आहे.
Post Views: 13