पंढरपूर – शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या पुढाकाराने आज बुधवार दि.21 रोजी चंद्रभागा वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २३ टन करा उचलला.
पंढरपूर नगरपरिषद, पालवी संस्था, कवठेकर प्रशाला नाथ चौक, विठ्ठल रुक्मिणी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, वेदांत गुरुकुल, क्रेडाई पंढरपूर, तिरूपती कन्ट्रक्शन पंढरपूर, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्याचबरोबर जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
या अभियानामध्ये संबंधित संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक, शाळांचे विद्यार्थी पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी प्रशासन, बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना, संगणक, आरोग्य, विद्युत, भांडार, उद्यान तसेच लेखा व कर विभागाचे प्रमुख व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी, मुख्याधिकारी महेश रोकडे नगराध्यक्षा. प्रणिता भालके, नगरसेवक ओंकार जोशी यांनी सहभाग घेतला.
चंद्रभागा वाळवंट परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला. अभियानादरम्यान तब्बल २३ टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. स्वयंसेवक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी श्रमदानातून परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. या अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
दर बुधवारी आयोजित करण्यात येणाऱ्या श्रमदान व स्वच्छता अभियानात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे, याबाबत उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
————–
चौकट- (नागरिकांना आवाहन)
पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व निर्मळ ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ‘स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन पंढरपूर शहराच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
——————–
चौकट- (‘स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’चा संदेश)
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. चंद्रभागा नदी व वाळवंट परिसराला धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व असल्याने हा परिसर स्वच्छ व निर्मळ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची आणि भाविकांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच“स्वच्छता हीच विठ्ठल सेवा”, “श्रमदानातून भक्ती” आणि “सहभागातून स्वच्छता” या संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
——————-
कोट
या वाळवंटामध्ये अवघ्या महाराष्टाची क्रांती झालेली आहे. अशा या वाळवंटामध्ये काही अपप्रवृत्ती व अंधश्रध्देमूळे स्वच्छ असलेले वाळवंट अस्वच्छ होत आहे. परंतू, चंद्रभागा वाळवंट स्वच्छ रहावे याकरीता पंढरपूर नगरपरिषद व वारकरी संघटना व संस्था यांनी सहभागातून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. ते कौतूकास्पद आहे. या अभियानात आमच्याही वारकरी संस्थेचे वारकरी सहभागी होऊन स्वच्छता करणार आहोत. हे स्वच्छता अभियान कायमस्वरुपी राबत राहो.
ह.भ.प.बंडातात्या कराडकर
(अध्यक्ष, वारकरी शिक्षण संस्था )
Post Views: 5